लासलगाव : राज्यात कांदा दरप्रश्नी वातावरण तापलेले असतानाच नाफेडच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.२०) जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि गोदामांचा दौरा करत कांदा खरेदी प्रक्रियेचा आढावा (NAFED onion procurement in Maharashtra) घेतला. पिंपळगाव बसवंतनंतर उमराणा, देवळा आणि चांदवड कृषी उत्पन्न बाजार समित्यांना भेट देत अधिकाऱ्यांनी बाजारातील परिस्थिती, साठवण क्षमता आणि खरेदी प्रक्रियेची माहिती घेतली. यामुळे कांदा प्रश्नावर प्रशासनाच्या हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

लासलगावात घेतलेल्या ‘कांदा एल्गार’ आंदोलनानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी १९ मेस पिंपळगाव बाजार समिती आणि नाफेडच्या गोदामाला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उमराणा, देवळा आणि चांदवड बाजार समित्यांचा दौरा करून खरेदी व्यवस्थेचा आढावा घेतला.

 

केंद्र शासनाने नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक फेडरेशनतर्फे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत अवघ्या ४४ टन कांद्याची खरेदी झाल्याने अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाजार समित्यांमधील सध्याचे दर, मागील वर्षातील बाजारभाव, शेतकऱ्यांची आवक आणि उपलब्ध साठवण सुविधा याबाबतही अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली.